Monday, 8 June 2020

लॉकडाऊन - अनलॉक

लॉकडाऊन सुरू होऊन तो आता अगदी संपण्यापर्यंतचा प्रवास तसा फारसा जवळून पाहिल्यामुळे, आत्ता पाहण्यात आलेल्या काही प्रासंगिक गोष्टी....(कारण पुणेकर असल्यामुळे कुठेही पळून गेलो नाही म्हणून कदाचित )

आजही एक चौक क्रॉस करण्यास अगदी नेहमी सारखे चार सिंग्नल आरामशीर लागतात, त्यामुळे कोणीही मुळीच घाई करत नाही अशातला काहीच प्रकार घडला नाही, अगदी एखादा का होईना हॉर्नवर ठाण मांडून बसलेला भेटला नाही, तरच नवल...

आता अर्थात गर्दी असल्यामुळे सायकल ट्रॅक आणि फूटपाथ वर गाडी घालण्याची कला अजूनही लोकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. असे करताना एक-दोन जणांना आरामशीर धक्के देत एखादा निघून जातो, आणि आजही तो इतरांना नजरेने आणखी जोरात खुण्णस देऊ शकतो तेही अगदी आरामत....कारण मास्क तोंडावर आहे डोळ्यावर नाही 😷

आणि कदाचित समोरचाही त्यांच्यावर असलेलं त्याचं प्रेम नकळत व्यक्त करून जातो... पण कदाचित त्यांच्या मास्कमुळे त्यांच्या शाब्दिक भावना तेवढ्या तीव्रतेने पोहचल्या जात नाहीत आणि पुढच्या बऱ्याचशा गोष्टी टळतात....

"नो एंट्री" असंही काही होत अस कदाचित आठवत नसावं, पण तुर्तास ठिक आहे, अजून काही सगळे रस्ते तसे सुरू झालेले नाही.

पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग माञ अशी तुंडुब भरलेली, टु-व्हीलरचं ठिकयं हो समजू शकतो. पण फोर व्हीलर, तर काय डौलात उभ्या होत्या...
अरे व्वा....काय हे दृश्य अगदी मनमोहकच....

ह्या सगळ्या भावगर्दी मध्ये कोणी-कोणाला ठोकलं आणि रस्त्याच्या मध्ये थांबलं नाही, असं जर झालं नसतं तर कदाचित दिवस सार्थकी लागला नसता, पण आपलं नशीब थोर आणि ह्याही प्रंसगाचं दर्शन झालं, थोडी गरमा-गरमी झालेली, पण ते आपलं मजा म्हणून पण पहायला ठिक होतं....

ह्या सगळ्यात भरीस भर म्हणून पुण्यातील प्रसिध्द असणारी हिरवळ (इतरांसाठी आपल्यासाठी नाही) सुध्दा नाही म्हणायला दिसलीच आणि नेहमीप्रमाणे कुठला इंडीकेटर देऊन, कुठे जाणार आणि नंतर परत कुठे तरी भलतीकडेच गायब झाली, आणि ती कुठे गेली हे कोड माञ नेहमीप्रमाणे कायम राहील.

कारण एकाच दुचाकीवर तिघांना पाहण्याचं भाग्यही आज लगेचच लाभलं

एरवी रस्त्यावर सगळ्याचे दिलखुलास काळेकुट्ट धुराने मेकअप करत जाणारी अशी, अगदी पहिलं प्रेम म्हणता येणारं पण सायकल नंतरचं माञ नक्की पाहिलं प्रेम असणारी अशी गुलाबो (पी.एम.टी. बस) माञ आज काही भरधाव जाताना दिसली नाही आणि तेवढीच तिची काय ती कमी भासली....

बाकी पुणे माञ परत पूर्ववत लवकरात लवकर येवो, आणि सर्व सुरळीत सुरू होवो. 🙏🏻

एवढीच काय ती " श्री " च्या चरणी प्रार्थना

!! श्रीमंत !!

No comments:

Post a Comment