Tuesday 26 January 2016

“ तोच संकल्प नव्याने ”

      नवीन वर्ष जसे नवे संकल्प करण्यासाठी असतं त्याचबरोबरीने ते जुन्या ठरवलेल्या संकल्पाच्या उजळणीसाठी सुदधा तेवढेच महत्वाचे असते. नाहीतर प्रत्येक वर्षी नव-नवीन संकल्प करण्यासाठी बुदधी खर्च करायची, संकल्प बनवायचे आणि पुढे जाऊन कंलेडरचे एक पान उलटुन जाईस पर्यत त्याबरोबरीने मागे पडत जायचे. त्यामुळे यंदा नवीन संकल्प करण्यापेक्षा जे संकल्प मागील वर्षी केले होते तेच पुढे चालु ठेवुन त्यातच वाढविण्याचा संकल्प यावर्षी आहे.

      संकल्प अगदी साधासा आणि सोपा वाटणारा असाच होता. जसा की रोज एका तरी जुन्या मित्राला फोन करायचा, अगदी सहजच. काहीही कारण नाही किंवा कोणतेही निमित्त नसताना. हे वाटत जरी तसे सोपे असले तरी, पुर्ण करण्यास तेवढेच कठीण देखील गेले सुरुवातीच्या काळात. कारण तेवढा वेळ काढुन फोन करणे अगदीच ही शुल्लक गोष्ट झाली, पण आता काय बोलणार ना ? हाही प्रश्न राहतोच. कारण हल्ली Whats app, facebook किंवा मग S.M.S. यातुन नेहमीच संवाद होत असतो. पण नंतर जाणीव झाली की हा संवाद फक्त एका चौकटीमध्ये आणि चौकटीपुरताच राहतो.

      त्यातच पुढे जाऊन आठवड्यातुन मग कमीत कमी दोन मित्रांना तरी भेटायचे. हा आता यामध्ये आपले रोजचे-रोज भेटणारे मित्र सोडुन हा. अशाच भेटण्यातुन पुढे मग ग्रुपसचे सुद्धा महिन्यातुन एकदा गेट-टुगेदर करायचे. म्हणजे जवळपास जुने सर्व मित्र परत मिळवण्य़ाची किंवा जोडण्यासाठी याचा फायदाच झाला. आणि यातुन जुनेच मित्र पुन्हा एकदा नव्याने सापडायला सुरुवात झाली. त्यातुन पुढे ट्रिप, चर्चा, गप्पा या गोष्टी होतातच आणि नव-नवीन कल्पनादेखील सुचतात.

      ह्या सर्वात महत्वाचे म्हणजे मन प्रसन्न होते, रोजच्याच जगण्यात नवीन ऊर्जा मिळते, परिस्थितीशी लढण्याची ताकद देखील यातुनच निर्माण होते.  कारण आपण जिवंत आहोत आणि खरेच जगत आहोत याची जाणीव मला या सर्व गोष्टीतुन होते.

      आणि तसेही शारीरीक स्वास्थय राखण्यासाठी जिम, योगा, रनिंग आहेतच की पण मानसिक स्वास्थय राखण्यासाठी या पेक्षा वेगळे आणि चांगला असा पर्याय आत्ता तरी माझ्याकडे नाही. आणि तसही माणुस हा समाजशील प्राणी आहेच. त्यासाठी का होईना जुन्या मित्रांना भेटण्यासाठी आणि पुन्हा तीच मजा करण्यासाठी हाच संकल्प आता पुढेही असाच चालु ठेवत पुढील वर्षी जास्तीत जास्त मित्रांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या पत्राने पाठविण्याचा संकल्प आहे. 
- कृष्णाई - 


1 comment: