Wednesday 14 February 2018

पहिला व्हॅलेंटाईन डे

        खरं तर सुरूवात काय करावी हाच प्रश्न, कारण प्रिय म्हणु शकत नाही, तसा तो आता माझा अधिकार नाही. असो....हा आपला पहिलाच व्हॅलेंटाईन डे अर्थांत प्रेमाचा दिवस; पण तो पहिला दिवसही आपल्याला एकत्र साजरा करता येणार नाही. एकाअर्थी तो आपण न साजरा केलेलाच बरा. कारण त्याने तुमच्या गोड आठवणीची भर पडेल.अगदी तुम्हांला लिहिताना पहिल्या पत्रांच्या, पहिल्या शब्दांसारखी आठवणीत  रहावी तशी...
           खरं सांगु का, आपण जेव्हा-जेव्हा भेटलो, एकत्र वेळ घालवला, तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशल आणि व्हेंलटाईन डेच होता. आणि तसं पण प्रेम करण्यासाठी एका दिवसांची गरज नसते कारण जेव्हा प्रेम होतं, तेव्हा आयुष्यांतला प्रत्येक दिवस प्रेममय होऊन जातो आणि मग ते दोन जीव या प्रेमाच्या सिंधुत बुडून जातात. आणि मग सुरु होतो एक गोड प्रवास, अर्थांत काही काटेरी वाटांसोबत !

             मग सगळंच बदलुन जातं, त्याचं नाव काढलं तरी चेहर्‍यावर हास्य खुलतं. जगण मग सुदंर वाटु लागतं. आपण कोणावर तरी प्रेम करावं आणि तसंच आपल्यावरही  त्यांनी प्रेम करावं,  ही भावनाच किती सुखद विलक्षण आहे ! भेटीची आस वाढु लागते. ते क्षण कधी संपूच नयेत असे वाटू लागते, एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून जेव्हा दोनं पाखरं बसलेली असतात त्यावेळी असणार्‍या शांततेत ती सर्व काही बोलुन जातात. त्यावेळी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही गरज लागत नाही. जणू काही त्या शांततेलाच शब्द फुटतात !

             असं काहीसं आपल्या बाबतीतही झालं खरंच, खूप छान होते ते दिवस. त्यातला एकही क्षण आज चेहर्‍यावर हास्य फुलवण्यास पुरेसा आहे आणि राहील. तुम्ही माझ्या आयुष्यात येण्यापुर्वीच्या काळात मी प्रेमावर, खर्‍या प्रेमावर कधीच विश्वास ठेवला नाही. तुम्ही आलात आणि सगळंच बदलंल. प्रेमाबद्दल कधी गंभीररित्या विचार न करणारा मी दिवसरात्र तुमच्या आठवणीत रमायला लागलो. तुम्ही येऊन माझं आयुष्यचं बदलवलं आणि मलाही !

             त्या सर्व सुखद क्षणांच्या आठवणी माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत. त्या क्षणांना एक वलयच आहे आनंदाच ! तुझं-माझं असंही झालं कधीकधी, पण त्याशिवाय प्रेमाला मजा नसतेच ते दिवस माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस होते आणि त्यांच्या आठवणी कधीच पुसता येणार नाहीत पण ज्या प्रकारे सुदंरशा चंद्र आणि चांदण्यांना कधी कधी अमावस्येमुळे विरह सहन करावा लागतो, तसंच त्या जीवनांतही या गोष्टींना सामोरे जावं लागतं.

             कारण प्रेम हे एखाद्याच्या डोळ्यांत पाणी आणण्यापेक्षा, तुम्ही त्याग करायला शिकवलं, खरं प्रेम त्यागातच असतं, आपण दोघांनीही असंच सोबत आयुष्य घालवावं असं खूप वाटतं. आपण खूप सुखी राहू पण ज्यांनी आपल्याला हे प्रेम करायच्या लायकीचं बनवलं, त्यांच्या डोळ्यांत पाणी आणून आपण दोघे कधीच सुखी राहणार नाही, त्यांना दुखवून आपल्याला जर काही सुख मिळणार असेल तर आपल्याला ते नको, हे तुमच्या मुळेच कदाचित समजुन आलं की भावनेंपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ.

            जेव्हा आपलं प्रेम आपल्याला मिळतं, तेच प्रेम खरं असतं का ? असंच प्रेम तर अमर प्रेम असतं, जे प्रेम मिळत नाही, असंच प्रेम अमर होत असतं, त्या प्रेमाला कुणीही मारु शकत नाही असंच आपल्या बाबतीत होणार आहे. आपण जरी एक झालो नाही तरी माझ्या मनात तुमच्यांबद्दल पुर्वीइतकेच प्रेम कायम राहील. तुमच्या आठवणी माझ्या सोबत कायम राहतील. त्या आठवणींना आणि त्या प्रेमाला मी कधीच क्षीण होऊ देणार नाही.

           मला जेव्हाही तुमची आठवण येईल, तेव्हा तिथे  या आठवणीचा वर्षांव नेहमीच होत राहील. या आठवणी आणि तुम्ही माझ्या ह्द्यातला सर्वांत अनमोल ठेवा आहे. तो माझ्यापासून कोणीच कधी हिरावून घेऊ शकणार नाही. माझ्या आयुष्यातलं तुमचं स्थान नेहमीच रिक्त राहील. ती जागा फक्त तुमची असेल, तुमच्या व्यतिरिक्त त्या जागेवर कुणाचाच आधिकार नसेल, तिथं फक्त आणि तुम्हीच असालं.

           तुम्ही अगदी ओजंळीत फुलं यावीत अशा आलातं. जणु काही सर्वत्र माझ्या सुगंधाचा वर्षाव केलात. आता ही फुलं आपल्याला कितीही हवी-हवीशी वाटली तरी त्यांना आवळलं तर ती सुकतात, म्हणुन त्यांना स्वातंत्र्य बहाल करावं. ती फिरुन परत आली तर आपली मानावी. नाही तर त्यांना गमवल्याची भावना मनात न ठेवता, समजावं की  ती फक्त आपली ओंजळ सुंगधीत करण्यासाठीच आली होती काही क्षणांसाठी...

आठवणींना ओलावा देत...
सुगंधाचा वर्षाव करत...
निर्मळ, निखळ, निरागस.

तुमचाच;
अनामिक

कृष्णा खैरे  



2 comments: