Thursday 8 November 2018

दिवाळी म्हणजे किल्ला, किल्ला म्हणजे शिवरायाचं हिंदवी स्वराज्य

        "अरे थांबा, मला पण येऊ द्या...मला पण यायचं आहे तुमच्या-सोबत...अरे थांबा की...मला नाही नेलं तर मी तुमच्या सगळ्यांच्या घरी जाऊन नावं सांगणार..." असं बोबड्या भाषेत ओरडत तीन-चार लहान मुले पाच-सहा सायकलीच्या मागे धावत होती आणि त्यांच्या पाठीमागे आणखी चार-पाच लहान मुले पळत होती. असे जवळपास नाही म्हणता, पंधरा-सोळा जण अगदी लढायला जाणारं सैन्य असतं तसे चालले होते. जसं घोडदळ, हत्तीदळ, पायदळ शा पद्धतीने पुढे रेंजर मोठ्या सायकलवाले, त्यानंतर लहान सायकलवाले आणि त्यातून राहलेली सेना पाठीमागे ढोल-नगाडे वाजवत यावी तशी ह्यांच्या नावाने शंखनाद करत येतच होती...आणि सैनिकांकडे जसे तलवारी, भाले आणि शस्ञा-अस्ञे असतात, तशीच ह्यांच्याकडे पोथी, पिशव्या, लोंखडी सळ्या, काही लाकडं वगैरे असं बरंचस सामान होतं आणि तेही कुठे-कुठे लपवून ठेवलेलं तरीही अगदी सहजपणे दिसणारं. ह्या अशा सेना फिरताना दिसल्या की, पूर्वी समजून यायचं की, आता दिवाळीचं आली. इंग्रजी वर्षातला तसा शेवटचा आणि सर्वांत मोठा म्हणता येईल, असा हा सणं-दिवाळं सणं.
        दसरा झाला की, सहामाही परिक्षा...आणि सहामाही परिक्षा झाली की, दिवाळीची सुट्टी, हे नेहमीच दरवर्षीचं ठरलेलं वेळापञक. ह्यामध्ये दरवर्षी दिवाळाला लागणाऱ्या सुट्ट्या आणि दिवाळी ह्या मध्ये फार कमी दिवसांचे अंतर असायचे. म्हणजे जसं की, उद्या दिवाळी सुरु होणारं आणि फार-फार तर मधे एखादं दुसरा दिवस जास्त असायचा तेव्हा परीक्षा संपायची. मग दिवाळीसाठीचा बनवायचा किल्ला त्याला कधी आणि कसा वेळ मिळणार ?  हा मोठा प्रश्न असायचा. त्यामुळेच की काय आधी चिञकलेचा पेपर शेवटी असायचा आणि नंतर मग इतिहास-भुगोलचे पेपर शेवटी रहायले लागले. म्हणूनच की काय, आम्हांला कोणाला चिञ कधी काढता आली नाही. इतिहास कधी रंगवता आला नाही आणि तसंही शाळेतला इतिहास हा सणावळीमध्येच गुंरफटलेला असायचा, त्यातही भुगोल हा गोलच का होता हे तर कधीच समजलं नाही...कारण तेव्हा त्या शेवटच्या दोन दिवसांत लक्ष असायचे; ते फक्त, दिवाळी आणि किल्ला बनवण्याकडे." असे असले तरी तेव्हा पेपर माञ पुर्ण लिहावे लागायचे, कारण आपण १० उत्तरे लिहिली, तर पाठीमागचा त्यातली ८ उत्तरे किमान बघून बरोबर लिहिलं, आणि त्यांच्यानंतरचा ६ उत्तरे तरी किमान व्यवस्थित लिहिलंआणि पुढेही हा क्रम चालू रहायचा. जेणेकरून आपल्यातील कोणी नापास वगैरे होणारं नाही ह्यांच्या साठी हे सर्व अट्टाहास चालायचा. असे एकूणच "एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ" सुरू असायचे.

        "किल्ला करायचा" हे दरवर्षी नक्की असायचं, पण कोणता करायचा ह्यासाठी प्रत्येकवेळी खडाजंगी लागायची. कारण जेवढी डोकी त्यातून तेवढे किल्ले बाहेर यायचे. त्यातील कित्येक जणांनी त्यांनी नाव सांगितलेले ते किल्ले कधी पाहिलेलेही नसायचे, पण आपण तोच किल्ला करायचा म्हणून एकूणच अट्टहास असायचा.... ह्या सगळ्यांत, सर्वांत जास्त डिमांडमध्ये असतील तर सिंहगड, रायगड, राजगड, लोहगड, पुंरदर, हरिशचंद्रगड, प्रतापगड, विशाळगड, तोरणा, शिवनेरी आणि त्याहीपेक्षा अगदीच जवळचे वाटणारे ते सर्व जलदुर्ग म्हणजे मुरूड, जंजीरा, सिंधूदुर्ग.....हे सर्व झाले खरेखुरे किल्ले. आणखी त्यामध्ये काल्पनिक किल्ले आणि काल्पनिक गोष्टी, मनोरे, बुरूज, विहिरी, तलाव, धबधबे वगैरे वगैरे यांची तर यादी भरपूर मोठी असायची....आणि एकमाञ खरं ह्यातील शेवटपर्यंत काहीच नक्की ठरत नसायाच, आणि चर्चा बरखास्त व्हायची. ती फक्त एका मुद्द्यावर, चला किल्ल्यासाठी सामग्री गोळा करायला लागा.

        आता पुढे नक्की हे ठरत नसतं, की कोण-कोण काय-काय आणणार ? काय गोळा करणार ?  कोणासोबत कोण जाणार ?


जंगल, प्राणी, किल्ल्यांची तटबंदी, मंदीर, कुस्तीचा आखाडा
हे सर्व प्रश्न सुटतात न सुटतात आणि पुढे एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो, की किल्ल्यासाठी लागणारी माती कशी आणि कुठून आणणार ??? कारण शहरांच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्यासाठी माती साधी पहायला मिळणं म्हणजे मोठी गोष्टी. त्यात किल्ल्यांसाठी लागणारी मऊ, चिखलं करता येणारी माती म्हणजे तर अशक्यच. मग त्यासाठी काही ठरलेली ठिकाणं असायची सरकारी शाळांची मैदानं, कबड्डी, खो-खो चे क्लबची मैदान, तेथेही नाही भेटली तर मग बाग अशी कुठे ना कुठे ती शोधायला लागायची, पण या सगळ्याच ठिकाणांवरुन माती आणनं तेवढं सहज शक्य आणि सोप नसायचं. कोणी बघितलं की, पंचाईत व्हायची. तेव्हा भरलेली पोती उचलायची, उकरून मोठ्या कष्टाने काढलेली माती जमेल तेवढी भरायची, आणि आपलं सर्व सामान गोळा करून, बाकी सगळं आहे तसं सोडून पळ ठोकायचा. त्यात जाताना एखाद्याच्या तरी सायकलची चैन पडायची. कोणाच्या तरी सायकलची हवा सोडलेली असायची, नाहीतर ज्याला डबल-सीट चालवता येत नाही त्यांच्याच पाठीमागे दुसरा कोणीतरी बसायचा आणि दोघेही पडायचे. 
ह्यासगळ्या मध्ये पाच पोती माती उकरून काढली, तर त्यातली तीन-एक भरली जायची आणि जागेवर पोहचेसपर्यंत सायकलवर आणलेल्या तीन पोत्यातील माती एकञ केली तर ती फक्त एक पोतेभरच भरायची. बाकी सर्व रस्त्याने सडा टाकत यावा, अशी सांडलेली असायची. त्यामुळे किल्ल्ल्यासाठी माती हा मोठा भाग असायचा. त्यांतही तिच्यावर आपण दुसऱ्या सगळ्यांच्या आधी कब्जा करून आपला वाटा गोळा करून ठेवावा लागायचा, नाहीतर किल्ला होणं काही शक्य नसायचं.

        मातीचा प्रश्न सुटला म्हणजे अर्धी मोहीम फत्ते पडलेली असायची. आता ह्या माती साठी दोन सुरक्षा-रक्षक ठेवायचे. कारण मातीची चोरी म्हणा किंवा पळवापळवी ही ठरलेली असायची. बाकीचे आता कोणी विटा आणायला जायचे, तर कोणी दगड. तेव्हा विटा तशा सहजा-सहजी भेटायच्या. कारण बांधकामाची कामे तेव्हा नेहमी कुठे ना कुठे तरी चालू असायची. ती फक्त चालता-फिरता लक्ष ठेवायची, आणि पाच-सहा ठिकाणांहून प्रत्येकाने एक-एक, दोन-दोन विटा मागून आणायच्या. आणि जर नाहीच भेटल्या तर शेवटी गनिमी काव्यांचा पर्याय उपलब्ध असायचाच. 
मुख्य दरवाजा, तोफा, तटबंदी 
        ह्या पुढचा भाग आता उरायाचा, तो म्हणजे किल्ल्यासाठी लागणारं कापडं म्हणजेच सुतळी पोती. ही एक गोष्ट मिळवणं म्हणजे वाघाच्या तोंडातून घास काढण्याचं कामं. कारण चांगली, नवीन, पातळ, अगदी किल्ल्याला पाहिजे तशी पोती फक्त एकांचकडे असायची. तो म्हणजे किराणा मालाचा दुकानदार, म्हणजे की शेठजी. बाकी ठिकाणीही कापडे, पोती मिळणे शक्य असायचं पण ती तेवढी चांगली नसायची. आणि तसंही ह्या शेठजीकडून वर्षातून एकदा का होईना आपल्या किल्ल्यासाठी काहीना काही मिळवलेचं पाहिजे, हा सगळ्याचांच अट्टाहास असायचा. शेठजीकडे, थोडा वेळ घालवला की, पोती तर भेटायचीचं, पण त्यासोबत त्यांची एक-अर्धा किलो साखर बाकीच्यांनी खाऊन संपलेली देखील असायची.

        या सगळ्या प्रवासांमध्ये दोन-अडीच दिवस गेलेले असतात आणि आता जवळपास दिवाळीचा पहिला दिवा लागलेला असतो, आणि किल्ल्याचं कुठे नामोनिशाणही नसतं. कारणं किल्ला कुठे बांधायचा हे कुठे ठरलेलं नसतं. किल्ल्यांसाठी जागा अशी हवी असते की, जिथे परकीय आक्रमणांपासून संरक्षण झाले पाहिजे. जसे की, कुञा, मांजर, बकऱ्या ह्या प्राण्यांच बाह्य आक्रमण तर उंदीर, घुशी यांच आंतर-आक्रमण आणि त्यातून वाचलाचं तर पार्किंगच्या गाड्या, दिवाळेचे मोठे फटाखे, दारूडे, दुसऱ्या गल्लीतील-वाड्यातील मुलं. त्यामुळे किल्ला बांधण्याची जागा अशी हवी कीजिथे पंधरा-सोळा मुलांना व्यवस्थित वावरता येईल.

        
         तेव्हा कोणा एखाद्याच्या घरी किल्ला बांधता यावा असं कोणाचही घरं नव्हतं. किंबहुना कित्येकांची अर्धीच कुंटुंब घरात राहत होती आणि अर्धी घरांबाहेर ती फक्त आणि फक्त घरातील असलेल्या अपुऱ्या जागेपायी. जागेच्या बाबतीत माञ तडजोड करुन शेवटी किल्ल्याचा आकार लहान-लहान करत आणावा लागायचा आणि अखेरीस एक आडोसा  पाहून तिथे किल्ला बांधणीला सुरुवात व्हायची. 

        पुढची जुळवा-जुळवा हा फार मोठा भाग नसतो. फक्त कोपऱ्यावरच्या  नारळवाल्याकडे जाऊन नारळांच्या करवंट्या आणि त्यांची काढलेली सालं. लाकूड बाजारातून काही लाकडांचे तुकडे, लहानशा फळ्या, खीळे. तिथेच असणाऱ्या सुतारांकडून थोडा भुस्सा वगैरे अशी सगळी साधन-सामुग्री कुवती प्रमाणे, लागेल तशी गोळा केली जाते. आणि बाकी-सारीक उरलेल्या गोष्टी आपल्या आपल्या घरांतून आपोआप येतातचं. त्यासाठी माञ बरंचसा ऐकायला लागायचं, पण तेव्हा दिवाळीच्या फराळांची तयारी चालू असल्यामुळे त्यातून तशी लवकर सुटका व्हायची.

        किल्ल्यावर धबधबा किंवा वाहती नदी असावी अशी प्रत्येकांची ईच्छा असायची, पण ती पूर्ण करणाच्या नादात कित्येकदा किल्ला वाहूनही गेला. आणि परत बांधायला लागायचा. त्यामुळे किल्ल्यावर तळं बनवणं नंतर सोईस्करपणे शिकलो. पण त्यातही किल्ल्यावर लाईटची माळ सोडण्याची एका बहाद्दरला हौस सुटली  आणि ती माळ सोडतना त्या तळ्यातल्या पाण्यात पडली आणि पुढे शॉर्ट-सकीर्ट आणि ऐनदिवाळीच्या दिवसांत लाईट गायब. पुढे लगेचच लाईट आणली हा वेगळा भाग. पण त्यानंतर किल्ल्यावर तळ किंवा पाणी असले की, लाईटच्या माळेएवजी आपल्या पणत्याच छान शोभून दिसू लागल्या. 

        किल्ला बांधण्यामध्ये असंख्य अडचणी यायच्या अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत मनांमध्ये भीती असायची की, आता कोणतं तरी विघ्न येऊन किल्ला अर्धवट राहतो की काय ?पण त्यावेळी फक्त "जय भवानी, जय शिवाजी" एवढी एक घोषणा अंगात स्फुरण चढवण्यास पुरेशी होती. किल्ला बनवण्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही हातभार हा लागलेला असायचा. त्यामुळेच की काय फार मोठा नसला, तरी एक छानसा असा किल्ला उभा रहायचा, जणू काही तो किल्ला होणे "ही श्रीचीं ईच्छा" च असायची. त्यावेळी प्रत्येकजण मोठा झाल्यावर मी नक्कीच मोठा किल्ला बांधेन, कमीत-कमी जेवढं घर आहे तेवढा तर नक्कीच किल्ला बनवेन, अशी स्वप्न पहायचा. पण दहावी नंतर परत आयुष्यात कधी किल्ला तयार झालाच नाही, आणि पुढेही कधी होईल असंही वाटत नव्हतं.



Aerial View
          पण म्हणतात ना, जेव्हा "श्रींची ईच्छा असते", तेव्हा सर्व काही होऊ शकत. जसा दरवर्षी लहान किल्ला व्हायचा, तसाच मोठा किल्लाही झाला, अगदी त्यांच्या हक्कांच्या जागेत.


कृष्णा अंकुश खैरे

No comments:

Post a Comment