Monday 8 March 2021

फक्त एका बेडरुम साठी ?

            माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की मी अभियांत्रिकीची  पदवी प्राप्त करुन अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नाेकरीला  लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवऴपास पुर्ण हाेत आले हाेते.

            आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे. मी असे ठरवले हाेते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलाे की पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल. 

             माझे वडिल सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट, अन तुटपुंजी पेंशन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते. घरची, आई-बाबाची खुप आठवण यायची. एकट वाटु लागायच. स्वस्तातल एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३  वेळा त्यांना काँल करत हाेताे. दिवस वार्‍यासारखे उडत हाेते. दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा. 

           लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय  घेतला. आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली. मी खुश हाेताे, आईबाबांना भेटणार हाेताे. नातेवाईक व मित्रांसाठी खुप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या हाेत्या. त्याही राहुन गेल्या.

          घरी पाेहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फाेटाे मी पाहिले, वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडिल समजुतदार हाेते. दाेन दिवसात माझे लग्न लागले. खुप सारे मित्र येतील अस वाटत असताना फक्त बाेटावर माेजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर  टेकवले. "आम्हाला तुझे पैसे नकाे पाेरा पण वरचेवर भेटायला येत जा " असं बाबा सांगताना त्यांचा आवाज खाेल गेला हाेता. बाबा आता थकले हाेते, चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत हाेत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती  केली व  आम्ही अमेरिकेला पाेहचलाे.

             पहिले दाेन वर्ष बायकाेला हा देश खुप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत हाेत. बचत कमी हाेऊ लागली पण ती खुश हाेती. हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल. कधीकधी ती आठवड्यातुन दाेनदा किंवा तिनदा भारतात फाेन करु लागली. दाेन वर्षानी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचाे तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे हाेते.

           दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचाे. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागन वर्ष सरत हाेती, भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले हाेते. एक दिवस अचानक आॕफीस मधे असताना भारतातन काॅल आला, "माेहन बाबां सकाळीच गेले रे". खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही,  अग्निला तर साेडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उदविग्न झालेल. दहा दिवसात दुसरा काॅल आला, आईची पण प्राणज्याेत मालवली हाेती. साेसायटीतील लाेकांनी विधी केले, नातवंडाचे ताेंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले हाेते.

           आईबाबा जाऊन दाेन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पाेकळी तयार झालेली, आईबापाची शेवटची ईच्छा , ईच्छाच राहिलेली.

 मुलांचा विराेध असताना भारतात येऊन स्तिरस्थावर हाेण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात हाेती. राहण्यासाठी घर शाेधत हाेताे पण आता पैसे कमी पडत हाेते नवीन घर ही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत अालाे. मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलाे.

         मुले माेठी झाली, मुलीने अमेरिकी मुलासाेबत लग्न केल. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहताे. मी ठरविले हाेते आता पुरे झाले, गाशा गुंडाळुन  भारतात आलाे. चांगल्या साेसायटीत ' दाेन बेडरुमचा' फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे हाेते. फ्लॅटही घेतला.

          आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दाेन बेडरुमच्या' फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहताे. उरलेल आयुष्य जिच्यासाेबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव साेडला.

       कधीकधी मला वाटते हा सर्व खटाटाेप केला ताे कशासाठी ? ? याचे माेल ते काय? ?

            माझे वडील भारतात राहत हाेते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट हाेता. त्यांनीदेखील त्यांच्या तरूणपणी गाव सोडल होतं, ते सुध्दा परत कधी जाऊ शकले नाही. माझ्याकडेही त्यांच्यापेक्षा जास्त असं काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले, मुलांना साेडुन आलाे, बायकाेपण गेली. 

        खिडकीतुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते, त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात. 

          अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फाेन येताे ते माझ्या तब्येतीची चाैकशी करतात, अजुनही त्यांना माझी आठवण येते यातच समाधान आहे. 

          आता जेव्हा माझा मृत्यु हाेईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांच भल कराे.

          पुन्हा प्रश्न कायम आहे, हे सर्व कशासाठी अन काय किंमत माेजुन.

मी अजुनही उत्तर शाेधताेय.

फक्त एका बेडरुम साठी ?

Thursday 5 November 2020

आम्ही आपली साधी सरळ माणसं

             विठूचा गजर करणारी, मुखी हरीनाम जपणारी, कीर्तन – अभंगात रमणारी, विठूच्या नामात रंगणारी, ज्ञानोबाला मानणारी, तुकोबाला जाणणारी, माणसांत देव पाहणारी, टाळकरी, विणाकरी.... अशी भक्तीच्या प्रवाहांत चालणारी वारकरी, आणि उभ्या आयुष्यांत कधीही मटण-मांस, मच्छी  न खाता परंपरा जपणारी माळकरी,

            आणि दारी तुळस असणारी, अशी आपली साधी सरळ माणसं...

            सोमवारी महादेवाला, शंकराला बेल वाहणारी, मंगळवारी देवीला जाणारी, गुरुवारी स्वामींना, दत्तगुरुंना, बाबांना, नाथांना श्रद्धेने फुलं वाहणारी, शनिवारी शनीला, मारुतीवर तेल चढवणारी, तर रविवारी खंडोबा, ज्योतीबांला पुजनारी, चतुर्थीला खास बुद्धीची देवता आणि कलांच्या अधिपती अशा गणपतीसाठी म्हणजेच बाप्पासाठी एक दिवस का होईना पण उपास करणारी, आणि तिथं बाप्पाशी मात्र एक वेगळ हक्काचं मैत्रीचं नातं असलेली, शक्तीची उपासक म्हणून नवरात्री नऊ दिवस देवीचा जागर करणारी, एकादशी पाळणारी, पौर्णिमा पाहणारी, आणि अमावास्या मानणारी....

            अशी आम्ही आपली साधी सरळ माणसं....

            शिवाजी महाराजांवर निष्ठा असणारी, गड-किल्ले सर करणारी, तत्व जपणारी, शब्दांला जागणारी, माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारी, धूर्तपणा आणि राजकारणीपणा पासून तशी दूरच असलेली

            अशी आपली साधी सरळ माणसं.....     

- कृष्णा खैरे

Monday 8 June 2020

लॉकडाऊन - अनलॉक

लॉकडाऊन सुरू होऊन तो आता अगदी संपण्यापर्यंतचा प्रवास तसा फारसा जवळून पाहिल्यामुळे, आत्ता पाहण्यात आलेल्या काही प्रासंगिक गोष्टी....(कारण पुणेकर असल्यामुळे कुठेही पळून गेलो नाही म्हणून कदाचित )

आजही एक चौक क्रॉस करण्यास अगदी नेहमी सारखे चार सिंग्नल आरामशीर लागतात, त्यामुळे कोणीही मुळीच घाई करत नाही अशातला काहीच प्रकार घडला नाही, अगदी एखादा का होईना हॉर्नवर ठाण मांडून बसलेला भेटला नाही, तरच नवल...

आता अर्थात गर्दी असल्यामुळे सायकल ट्रॅक आणि फूटपाथ वर गाडी घालण्याची कला अजूनही लोकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. असे करताना एक-दोन जणांना आरामशीर धक्के देत एखादा निघून जातो, आणि आजही तो इतरांना नजरेने आणखी जोरात खुण्णस देऊ शकतो तेही अगदी आरामत....कारण मास्क तोंडावर आहे डोळ्यावर नाही 😷

आणि कदाचित समोरचाही त्यांच्यावर असलेलं त्याचं प्रेम नकळत व्यक्त करून जातो... पण कदाचित त्यांच्या मास्कमुळे त्यांच्या शाब्दिक भावना तेवढ्या तीव्रतेने पोहचल्या जात नाहीत आणि पुढच्या बऱ्याचशा गोष्टी टळतात....

"नो एंट्री" असंही काही होत अस कदाचित आठवत नसावं, पण तुर्तास ठिक आहे, अजून काही सगळे रस्ते तसे सुरू झालेले नाही.

पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग माञ अशी तुंडुब भरलेली, टु-व्हीलरचं ठिकयं हो समजू शकतो. पण फोर व्हीलर, तर काय डौलात उभ्या होत्या...
अरे व्वा....काय हे दृश्य अगदी मनमोहकच....

ह्या सगळ्या भावगर्दी मध्ये कोणी-कोणाला ठोकलं आणि रस्त्याच्या मध्ये थांबलं नाही, असं जर झालं नसतं तर कदाचित दिवस सार्थकी लागला नसता, पण आपलं नशीब थोर आणि ह्याही प्रंसगाचं दर्शन झालं, थोडी गरमा-गरमी झालेली, पण ते आपलं मजा म्हणून पण पहायला ठिक होतं....

ह्या सगळ्यात भरीस भर म्हणून पुण्यातील प्रसिध्द असणारी हिरवळ (इतरांसाठी आपल्यासाठी नाही) सुध्दा नाही म्हणायला दिसलीच आणि नेहमीप्रमाणे कुठला इंडीकेटर देऊन, कुठे जाणार आणि नंतर परत कुठे तरी भलतीकडेच गायब झाली, आणि ती कुठे गेली हे कोड माञ नेहमीप्रमाणे कायम राहील.

कारण एकाच दुचाकीवर तिघांना पाहण्याचं भाग्यही आज लगेचच लाभलं

एरवी रस्त्यावर सगळ्याचे दिलखुलास काळेकुट्ट धुराने मेकअप करत जाणारी अशी, अगदी पहिलं प्रेम म्हणता येणारं पण सायकल नंतरचं माञ नक्की पाहिलं प्रेम असणारी अशी गुलाबो (पी.एम.टी. बस) माञ आज काही भरधाव जाताना दिसली नाही आणि तेवढीच तिची काय ती कमी भासली....

बाकी पुणे माञ परत पूर्ववत लवकरात लवकर येवो, आणि सर्व सुरळीत सुरू होवो. 🙏🏻

एवढीच काय ती " श्री " च्या चरणी प्रार्थना

!! श्रीमंत !!

Monday 9 December 2019

कुछ बातें होती है...


कुछ बातें होती है
हां कुछ बातें होती है
कुछ हसती है कुछ हसाती है
कुछ गमों के सायों को
लेकर बस युहीं दिल को रुलाती है...
न जाने ये बातें क्यों ऐसी होती है...
पर क्या करें बातें तो बस बातें होती है....

बातों की न कभी शुरुआत होती है
और ना-ही बातों का कभी अंत,
बस कभी-कभी खामोशी होती है,
तो कभी रूसवाई होती है,
कभी शीतल शांती, तो कभी गहरी खाई है
सुनाई दे तो भंवर है,
और न सुनाई दे तो अपने ही दिल का सुकून है...

बातें तो होती ऐसे ही है
हम करे तो गपशप होती है
लोग कहे तो ताना होता है
सामने से बोले तारीफ
पीठ पीछे आग की चिंगारी होती है....
और कोई उंचा बोले तो तहजीब होती है...
बातें तो बातें होती है...

बातों को मेरे तुम भी कभी दिल पे मत लेना
क्योकिं कहने वाली हर बात शायद मैं कभी कह भी न सकूँ
और कहीं हुई हर बात शायद मैं कभी कहना भी न चाहुँ

पर बातें तो बातें ही होती हैं....
तभी तो कई बार बिना लब्जो की, 
खामोशी से ही सब कुछ बयाँ कर जाती है...


-         कृष्णा खैरे   

Thursday 8 November 2018

दिवाळी म्हणजे किल्ला, किल्ला म्हणजे शिवरायाचं हिंदवी स्वराज्य

        "अरे थांबा, मला पण येऊ द्या...मला पण यायचं आहे तुमच्या-सोबत...अरे थांबा की...मला नाही नेलं तर मी तुमच्या सगळ्यांच्या घरी जाऊन नावं सांगणार..." असं बोबड्या भाषेत ओरडत तीन-चार लहान मुले पाच-सहा सायकलीच्या मागे धावत होती आणि त्यांच्या पाठीमागे आणखी चार-पाच लहान मुले पळत होती. असे जवळपास नाही म्हणता, पंधरा-सोळा जण अगदी लढायला जाणारं सैन्य असतं तसे चालले होते. जसं घोडदळ, हत्तीदळ, पायदळ शा पद्धतीने पुढे रेंजर मोठ्या सायकलवाले, त्यानंतर लहान सायकलवाले आणि त्यातून राहलेली सेना पाठीमागे ढोल-नगाडे वाजवत यावी तशी ह्यांच्या नावाने शंखनाद करत येतच होती...आणि सैनिकांकडे जसे तलवारी, भाले आणि शस्ञा-अस्ञे असतात, तशीच ह्यांच्याकडे पोथी, पिशव्या, लोंखडी सळ्या, काही लाकडं वगैरे असं बरंचस सामान होतं आणि तेही कुठे-कुठे लपवून ठेवलेलं तरीही अगदी सहजपणे दिसणारं. ह्या अशा सेना फिरताना दिसल्या की, पूर्वी समजून यायचं की, आता दिवाळीचं आली. इंग्रजी वर्षातला तसा शेवटचा आणि सर्वांत मोठा म्हणता येईल, असा हा सणं-दिवाळं सणं.
        दसरा झाला की, सहामाही परिक्षा...आणि सहामाही परिक्षा झाली की, दिवाळीची सुट्टी, हे नेहमीच दरवर्षीचं ठरलेलं वेळापञक. ह्यामध्ये दरवर्षी दिवाळाला लागणाऱ्या सुट्ट्या आणि दिवाळी ह्या मध्ये फार कमी दिवसांचे अंतर असायचे. म्हणजे जसं की, उद्या दिवाळी सुरु होणारं आणि फार-फार तर मधे एखादं दुसरा दिवस जास्त असायचा तेव्हा परीक्षा संपायची. मग दिवाळीसाठीचा बनवायचा किल्ला त्याला कधी आणि कसा वेळ मिळणार ?  हा मोठा प्रश्न असायचा. त्यामुळेच की काय आधी चिञकलेचा पेपर शेवटी असायचा आणि नंतर मग इतिहास-भुगोलचे पेपर शेवटी रहायले लागले. म्हणूनच की काय, आम्हांला कोणाला चिञ कधी काढता आली नाही. इतिहास कधी रंगवता आला नाही आणि तसंही शाळेतला इतिहास हा सणावळीमध्येच गुंरफटलेला असायचा, त्यातही भुगोल हा गोलच का होता हे तर कधीच समजलं नाही...कारण तेव्हा त्या शेवटच्या दोन दिवसांत लक्ष असायचे; ते फक्त, दिवाळी आणि किल्ला बनवण्याकडे." असे असले तरी तेव्हा पेपर माञ पुर्ण लिहावे लागायचे, कारण आपण १० उत्तरे लिहिली, तर पाठीमागचा त्यातली ८ उत्तरे किमान बघून बरोबर लिहिलं, आणि त्यांच्यानंतरचा ६ उत्तरे तरी किमान व्यवस्थित लिहिलंआणि पुढेही हा क्रम चालू रहायचा. जेणेकरून आपल्यातील कोणी नापास वगैरे होणारं नाही ह्यांच्या साठी हे सर्व अट्टाहास चालायचा. असे एकूणच "एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ" सुरू असायचे.

        "किल्ला करायचा" हे दरवर्षी नक्की असायचं, पण कोणता करायचा ह्यासाठी प्रत्येकवेळी खडाजंगी लागायची. कारण जेवढी डोकी त्यातून तेवढे किल्ले बाहेर यायचे. त्यातील कित्येक जणांनी त्यांनी नाव सांगितलेले ते किल्ले कधी पाहिलेलेही नसायचे, पण आपण तोच किल्ला करायचा म्हणून एकूणच अट्टहास असायचा.... ह्या सगळ्यांत, सर्वांत जास्त डिमांडमध्ये असतील तर सिंहगड, रायगड, राजगड, लोहगड, पुंरदर, हरिशचंद्रगड, प्रतापगड, विशाळगड, तोरणा, शिवनेरी आणि त्याहीपेक्षा अगदीच जवळचे वाटणारे ते सर्व जलदुर्ग म्हणजे मुरूड, जंजीरा, सिंधूदुर्ग.....हे सर्व झाले खरेखुरे किल्ले. आणखी त्यामध्ये काल्पनिक किल्ले आणि काल्पनिक गोष्टी, मनोरे, बुरूज, विहिरी, तलाव, धबधबे वगैरे वगैरे यांची तर यादी भरपूर मोठी असायची....आणि एकमाञ खरं ह्यातील शेवटपर्यंत काहीच नक्की ठरत नसायाच, आणि चर्चा बरखास्त व्हायची. ती फक्त एका मुद्द्यावर, चला किल्ल्यासाठी सामग्री गोळा करायला लागा.

        आता पुढे नक्की हे ठरत नसतं, की कोण-कोण काय-काय आणणार ? काय गोळा करणार ?  कोणासोबत कोण जाणार ?


जंगल, प्राणी, किल्ल्यांची तटबंदी, मंदीर, कुस्तीचा आखाडा
हे सर्व प्रश्न सुटतात न सुटतात आणि पुढे एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो, की किल्ल्यासाठी लागणारी माती कशी आणि कुठून आणणार ??? कारण शहरांच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्यासाठी माती साधी पहायला मिळणं म्हणजे मोठी गोष्टी. त्यात किल्ल्यांसाठी लागणारी मऊ, चिखलं करता येणारी माती म्हणजे तर अशक्यच. मग त्यासाठी काही ठरलेली ठिकाणं असायची सरकारी शाळांची मैदानं, कबड्डी, खो-खो चे क्लबची मैदान, तेथेही नाही भेटली तर मग बाग अशी कुठे ना कुठे ती शोधायला लागायची, पण या सगळ्याच ठिकाणांवरुन माती आणनं तेवढं सहज शक्य आणि सोप नसायचं. कोणी बघितलं की, पंचाईत व्हायची. तेव्हा भरलेली पोती उचलायची, उकरून मोठ्या कष्टाने काढलेली माती जमेल तेवढी भरायची, आणि आपलं सर्व सामान गोळा करून, बाकी सगळं आहे तसं सोडून पळ ठोकायचा. त्यात जाताना एखाद्याच्या तरी सायकलची चैन पडायची. कोणाच्या तरी सायकलची हवा सोडलेली असायची, नाहीतर ज्याला डबल-सीट चालवता येत नाही त्यांच्याच पाठीमागे दुसरा कोणीतरी बसायचा आणि दोघेही पडायचे. 
ह्यासगळ्या मध्ये पाच पोती माती उकरून काढली, तर त्यातली तीन-एक भरली जायची आणि जागेवर पोहचेसपर्यंत सायकलवर आणलेल्या तीन पोत्यातील माती एकञ केली तर ती फक्त एक पोतेभरच भरायची. बाकी सर्व रस्त्याने सडा टाकत यावा, अशी सांडलेली असायची. त्यामुळे किल्ल्ल्यासाठी माती हा मोठा भाग असायचा. त्यांतही तिच्यावर आपण दुसऱ्या सगळ्यांच्या आधी कब्जा करून आपला वाटा गोळा करून ठेवावा लागायचा, नाहीतर किल्ला होणं काही शक्य नसायचं.

        मातीचा प्रश्न सुटला म्हणजे अर्धी मोहीम फत्ते पडलेली असायची. आता ह्या माती साठी दोन सुरक्षा-रक्षक ठेवायचे. कारण मातीची चोरी म्हणा किंवा पळवापळवी ही ठरलेली असायची. बाकीचे आता कोणी विटा आणायला जायचे, तर कोणी दगड. तेव्हा विटा तशा सहजा-सहजी भेटायच्या. कारण बांधकामाची कामे तेव्हा नेहमी कुठे ना कुठे तरी चालू असायची. ती फक्त चालता-फिरता लक्ष ठेवायची, आणि पाच-सहा ठिकाणांहून प्रत्येकाने एक-एक, दोन-दोन विटा मागून आणायच्या. आणि जर नाहीच भेटल्या तर शेवटी गनिमी काव्यांचा पर्याय उपलब्ध असायचाच. 
मुख्य दरवाजा, तोफा, तटबंदी 
        ह्या पुढचा भाग आता उरायाचा, तो म्हणजे किल्ल्यासाठी लागणारं कापडं म्हणजेच सुतळी पोती. ही एक गोष्ट मिळवणं म्हणजे वाघाच्या तोंडातून घास काढण्याचं कामं. कारण चांगली, नवीन, पातळ, अगदी किल्ल्याला पाहिजे तशी पोती फक्त एकांचकडे असायची. तो म्हणजे किराणा मालाचा दुकानदार, म्हणजे की शेठजी. बाकी ठिकाणीही कापडे, पोती मिळणे शक्य असायचं पण ती तेवढी चांगली नसायची. आणि तसंही ह्या शेठजीकडून वर्षातून एकदा का होईना आपल्या किल्ल्यासाठी काहीना काही मिळवलेचं पाहिजे, हा सगळ्याचांच अट्टाहास असायचा. शेठजीकडे, थोडा वेळ घालवला की, पोती तर भेटायचीचं, पण त्यासोबत त्यांची एक-अर्धा किलो साखर बाकीच्यांनी खाऊन संपलेली देखील असायची.

        या सगळ्या प्रवासांमध्ये दोन-अडीच दिवस गेलेले असतात आणि आता जवळपास दिवाळीचा पहिला दिवा लागलेला असतो, आणि किल्ल्याचं कुठे नामोनिशाणही नसतं. कारणं किल्ला कुठे बांधायचा हे कुठे ठरलेलं नसतं. किल्ल्यांसाठी जागा अशी हवी असते की, जिथे परकीय आक्रमणांपासून संरक्षण झाले पाहिजे. जसे की, कुञा, मांजर, बकऱ्या ह्या प्राण्यांच बाह्य आक्रमण तर उंदीर, घुशी यांच आंतर-आक्रमण आणि त्यातून वाचलाचं तर पार्किंगच्या गाड्या, दिवाळेचे मोठे फटाखे, दारूडे, दुसऱ्या गल्लीतील-वाड्यातील मुलं. त्यामुळे किल्ला बांधण्याची जागा अशी हवी कीजिथे पंधरा-सोळा मुलांना व्यवस्थित वावरता येईल.

        
         तेव्हा कोणा एखाद्याच्या घरी किल्ला बांधता यावा असं कोणाचही घरं नव्हतं. किंबहुना कित्येकांची अर्धीच कुंटुंब घरात राहत होती आणि अर्धी घरांबाहेर ती फक्त आणि फक्त घरातील असलेल्या अपुऱ्या जागेपायी. जागेच्या बाबतीत माञ तडजोड करुन शेवटी किल्ल्याचा आकार लहान-लहान करत आणावा लागायचा आणि अखेरीस एक आडोसा  पाहून तिथे किल्ला बांधणीला सुरुवात व्हायची. 

        पुढची जुळवा-जुळवा हा फार मोठा भाग नसतो. फक्त कोपऱ्यावरच्या  नारळवाल्याकडे जाऊन नारळांच्या करवंट्या आणि त्यांची काढलेली सालं. लाकूड बाजारातून काही लाकडांचे तुकडे, लहानशा फळ्या, खीळे. तिथेच असणाऱ्या सुतारांकडून थोडा भुस्सा वगैरे अशी सगळी साधन-सामुग्री कुवती प्रमाणे, लागेल तशी गोळा केली जाते. आणि बाकी-सारीक उरलेल्या गोष्टी आपल्या आपल्या घरांतून आपोआप येतातचं. त्यासाठी माञ बरंचसा ऐकायला लागायचं, पण तेव्हा दिवाळीच्या फराळांची तयारी चालू असल्यामुळे त्यातून तशी लवकर सुटका व्हायची.

        किल्ल्यावर धबधबा किंवा वाहती नदी असावी अशी प्रत्येकांची ईच्छा असायची, पण ती पूर्ण करणाच्या नादात कित्येकदा किल्ला वाहूनही गेला. आणि परत बांधायला लागायचा. त्यामुळे किल्ल्यावर तळं बनवणं नंतर सोईस्करपणे शिकलो. पण त्यातही किल्ल्यावर लाईटची माळ सोडण्याची एका बहाद्दरला हौस सुटली  आणि ती माळ सोडतना त्या तळ्यातल्या पाण्यात पडली आणि पुढे शॉर्ट-सकीर्ट आणि ऐनदिवाळीच्या दिवसांत लाईट गायब. पुढे लगेचच लाईट आणली हा वेगळा भाग. पण त्यानंतर किल्ल्यावर तळ किंवा पाणी असले की, लाईटच्या माळेएवजी आपल्या पणत्याच छान शोभून दिसू लागल्या. 

        किल्ला बांधण्यामध्ये असंख्य अडचणी यायच्या अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत मनांमध्ये भीती असायची की, आता कोणतं तरी विघ्न येऊन किल्ला अर्धवट राहतो की काय ?पण त्यावेळी फक्त "जय भवानी, जय शिवाजी" एवढी एक घोषणा अंगात स्फुरण चढवण्यास पुरेशी होती. किल्ला बनवण्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही हातभार हा लागलेला असायचा. त्यामुळेच की काय फार मोठा नसला, तरी एक छानसा असा किल्ला उभा रहायचा, जणू काही तो किल्ला होणे "ही श्रीचीं ईच्छा" च असायची. त्यावेळी प्रत्येकजण मोठा झाल्यावर मी नक्कीच मोठा किल्ला बांधेन, कमीत-कमी जेवढं घर आहे तेवढा तर नक्कीच किल्ला बनवेन, अशी स्वप्न पहायचा. पण दहावी नंतर परत आयुष्यात कधी किल्ला तयार झालाच नाही, आणि पुढेही कधी होईल असंही वाटत नव्हतं.Aerial View
          पण म्हणतात ना, जेव्हा "श्रींची ईच्छा असते", तेव्हा सर्व काही होऊ शकत. जसा दरवर्षी लहान किल्ला व्हायचा, तसाच मोठा किल्लाही झाला, अगदी त्यांच्या हक्कांच्या जागेत.


कृष्णा अंकुश खैरे

Wednesday 7 November 2018

दिवाळी आणि किल्ला फोटोज-२०१८

Aerial View 1
Aerial View 2 

महाराजांची मूर्ती 
कुस्तीचा आखाडा 

गडावरील मंदीर
दिवाळीचे झेडूचे तोरण 
Wednesday 14 February 2018

पहिला व्हॅलेंटाईन डे

        खरं तर सुरूवात काय करावी हाच प्रश्न, कारण प्रिय म्हणु शकत नाही, तसा तो आता माझा अधिकार नाही. असो....हा आपला पहिलाच व्हॅलेंटाईन डे अर्थांत प्रेमाचा दिवस; पण तो पहिला दिवसही आपल्याला एकत्र साजरा करता येणार नाही. एकाअर्थी तो आपण न साजरा केलेलाच बरा. कारण त्याने तुमच्या गोड आठवणीची भर पडेल.अगदी तुम्हांला लिहिताना पहिल्या पत्रांच्या, पहिल्या शब्दांसारखी आठवणीत  रहावी तशी...
           खरं सांगु का, आपण जेव्हा-जेव्हा भेटलो, एकत्र वेळ घालवला, तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशल आणि व्हेंलटाईन डेच होता. आणि तसं पण प्रेम करण्यासाठी एका दिवसांची गरज नसते कारण जेव्हा प्रेम होतं, तेव्हा आयुष्यांतला प्रत्येक दिवस प्रेममय होऊन जातो आणि मग ते दोन जीव या प्रेमाच्या सिंधुत बुडून जातात. आणि मग सुरु होतो एक गोड प्रवास, अर्थांत काही काटेरी वाटांसोबत !

             मग सगळंच बदलुन जातं, त्याचं नाव काढलं तरी चेहर्‍यावर हास्य खुलतं. जगण मग सुदंर वाटु लागतं. आपण कोणावर तरी प्रेम करावं आणि तसंच आपल्यावरही  त्यांनी प्रेम करावं,  ही भावनाच किती सुखद विलक्षण आहे ! भेटीची आस वाढु लागते. ते क्षण कधी संपूच नयेत असे वाटू लागते, एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून जेव्हा दोनं पाखरं बसलेली असतात त्यावेळी असणार्‍या शांततेत ती सर्व काही बोलुन जातात. त्यावेळी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही गरज लागत नाही. जणू काही त्या शांततेलाच शब्द फुटतात !

             असं काहीसं आपल्या बाबतीतही झालं खरंच, खूप छान होते ते दिवस. त्यातला एकही क्षण आज चेहर्‍यावर हास्य फुलवण्यास पुरेसा आहे आणि राहील. तुम्ही माझ्या आयुष्यात येण्यापुर्वीच्या काळात मी प्रेमावर, खर्‍या प्रेमावर कधीच विश्वास ठेवला नाही. तुम्ही आलात आणि सगळंच बदलंल. प्रेमाबद्दल कधी गंभीररित्या विचार न करणारा मी दिवसरात्र तुमच्या आठवणीत रमायला लागलो. तुम्ही येऊन माझं आयुष्यचं बदलवलं आणि मलाही !

             त्या सर्व सुखद क्षणांच्या आठवणी माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत. त्या क्षणांना एक वलयच आहे आनंदाच ! तुझं-माझं असंही झालं कधीकधी, पण त्याशिवाय प्रेमाला मजा नसतेच ते दिवस माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस होते आणि त्यांच्या आठवणी कधीच पुसता येणार नाहीत पण ज्या प्रकारे सुदंरशा चंद्र आणि चांदण्यांना कधी कधी अमावस्येमुळे विरह सहन करावा लागतो, तसंच त्या जीवनांतही या गोष्टींना सामोरे जावं लागतं.

             कारण प्रेम हे एखाद्याच्या डोळ्यांत पाणी आणण्यापेक्षा, तुम्ही त्याग करायला शिकवलं, खरं प्रेम त्यागातच असतं, आपण दोघांनीही असंच सोबत आयुष्य घालवावं असं खूप वाटतं. आपण खूप सुखी राहू पण ज्यांनी आपल्याला हे प्रेम करायच्या लायकीचं बनवलं, त्यांच्या डोळ्यांत पाणी आणून आपण दोघे कधीच सुखी राहणार नाही, त्यांना दुखवून आपल्याला जर काही सुख मिळणार असेल तर आपल्याला ते नको, हे तुमच्या मुळेच कदाचित समजुन आलं की भावनेंपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ.

            जेव्हा आपलं प्रेम आपल्याला मिळतं, तेच प्रेम खरं असतं का ? असंच प्रेम तर अमर प्रेम असतं, जे प्रेम मिळत नाही, असंच प्रेम अमर होत असतं, त्या प्रेमाला कुणीही मारु शकत नाही असंच आपल्या बाबतीत होणार आहे. आपण जरी एक झालो नाही तरी माझ्या मनात तुमच्यांबद्दल पुर्वीइतकेच प्रेम कायम राहील. तुमच्या आठवणी माझ्या सोबत कायम राहतील. त्या आठवणींना आणि त्या प्रेमाला मी कधीच क्षीण होऊ देणार नाही.

           मला जेव्हाही तुमची आठवण येईल, तेव्हा तिथे  या आठवणीचा वर्षांव नेहमीच होत राहील. या आठवणी आणि तुम्ही माझ्या ह्द्यातला सर्वांत अनमोल ठेवा आहे. तो माझ्यापासून कोणीच कधी हिरावून घेऊ शकणार नाही. माझ्या आयुष्यातलं तुमचं स्थान नेहमीच रिक्त राहील. ती जागा फक्त तुमची असेल, तुमच्या व्यतिरिक्त त्या जागेवर कुणाचाच आधिकार नसेल, तिथं फक्त आणि तुम्हीच असालं.

           तुम्ही अगदी ओजंळीत फुलं यावीत अशा आलातं. जणु काही सर्वत्र माझ्या सुगंधाचा वर्षाव केलात. आता ही फुलं आपल्याला कितीही हवी-हवीशी वाटली तरी त्यांना आवळलं तर ती सुकतात, म्हणुन त्यांना स्वातंत्र्य बहाल करावं. ती फिरुन परत आली तर आपली मानावी. नाही तर त्यांना गमवल्याची भावना मनात न ठेवता, समजावं की  ती फक्त आपली ओंजळ सुंगधीत करण्यासाठीच आली होती काही क्षणांसाठी...

आठवणींना ओलावा देत...
सुगंधाचा वर्षाव करत...
निर्मळ, निखळ, निरागस.

तुमचाच;
अनामिक

कृष्णा खैरे